Landed in Japan

ट्रींग ट्रींग .. फोनची बेल वाजली. मी मनोमन सुखावलो. त्याला कारणही तसेच होते. महिन्यातून 20 दिवस फोन बंद असायचा कारण लाईनमनला पैसे हवे होते आणि मी काही ते द्यायला तयार नव्हतो. ही गोष्ट आहे 1997 च्या मार्च मधली. तेव्हा आता सारखे मोबाईल नव्हते. मी MTNL च्या डायरेक्टरना ना भेटून त्या लाईनमनचं नाव सांगितलं पण उपयोग शून्य.
फोनवर दिवाकर होता. आम्ही दोघे एकाच कंपनीत काम करायचो. त्याला जपानमध्ये नोकरी मिळाल्यावर तो निघून गेलेला. त्या नंतर फारशी गाठभेट नव्हती. त्याचा आवाज ऐकून मला आनंद झाला असला तरी मागच्या वर्षी तो न भेटता निघून गेल्याचा राग पण होता. तो म्हणाला की तो जपानहून बोलतो आहे. तिथे एक नोकरी आहे आणि तू येशील का म्हणून विचारत होता. मला वाटलं माझी मस्करी करतोय मग मी त्याला शिव्याच घालायला लागलो. बऱ्याच वेळाने मला कळलं की तो खरं बोलतोय आणि हा खरंच इंटरनॅशनल कॉल आहे. मग मला टेंशन आलं. म्हटलं की चल फोन ठेवतो तुला बिल येईल. तर म्हणाला की येऊ दे बिल. एक तास तरी बोल. हा तुझा इंन्टरव्यू चालला आहे.
आणि खरचं सासऱ्यांकडून  ८० हजार कर्ज घेऊन मी  19 मे ला मी जपानच्या विमानात बसलो. विमान ९०% रिकाम होतं. मला वाटलं की आता काय हे जाणार नाही पण उडालं एकदाचं.  दुसऱ्या दिवशी चा सुर्य उगवला तो जपानच्या भूमीवर. सातवीत असताना भूगोलात जपान नावाचा धडा होता. उगवत्या सूर्याचा देश. हिरोशिमा नागासाकी , सुमो, त्सुनामी अनेक शब्द मनात तरंगू लागले. मी खिडकीतून उंच इमारती दिसतात का ते बघत होतो पण नजरेसमोर फक्त शेतं दिसत होती. शेतं बघता बघता विमान खाली आलं आणि जमिनीवर उतरलं सुद्धा. मी थोडा गोंधळून गेलो म्हटलं चुकून भलत्याच विमानात तर नाही ना बसलो.  नंतर कळलं की टोकियोचा हा विमानतळ नरीता नावाच्या गावात आहे आणि गमतीदार गोष्ट म्हणजे तो रात्री १२ ते ५ बंद असतो. का  तर लोकांची झोपमोड होते म्हणे. कहर म्हणजे या वेळेत ट्रेनसुद्धा बंद असतात.  धन्य ते सरकार .... टोकियोला आणखी एक विमानतळ आहे. तो हनेदाला आहे. हा २०१० साली शहराच्या जरा जवळ बांधला.  जास्त करून आंतरदेशीय विमानं इथे उतरतात. असो. मी प्रथमच परदेशात आल्यामुळे सर्व लोकांच्या बरोबर चालायला लागलो. विमानतळ प्रशस्त, स्वच्छ असून अतिशय कल्पकतेने सजवला होता. बऱ्याच ठिकाणी जपानच्या काही प्रसिद्ध जागांचे फोटो लावलेले आणि त्यावर आपले स्वागत आहे असे इंग्रजी तसेच जपानी भाषेत लिहीले होते. विमानतळावर अजिबात गर्दी नव्हती. मी आपला मेंढरासारखा सर्व लोकांबरोबर बाहेर पडलो. समोरच दिवाकर उभा होता. मला जोरदार मिठी मारून त्याने माझं स्वागत केलं. त्यानंतरची १५ वर्ष जपान ही माझी कर्मभूमी झाली.
तुम्ही मला विचाराल की तुम्हांला जपानमध्ये सर्वात जास्त काय आवडलं तर मी म्हणेन माणसं. शेवटी देश देश म्हणजे काय हो..माणसंच की. ह्या लोकांचं वर्णन करायचं तर  रंग उजळ, मध्यम बांधा, बारीक डोळे आणि चपटे नाक. कित्येक वर्ष माझ्या मुलाला अस वाटायच की त्याला ह्यांच्या पेक्षा जास्त दिसतं. ह्या लोकांना आपले मोठे डोळे खूप आवडतात. एक जपानी म्हण आहे, नाई मोनो नेदारी. जे आपल्यालाकडे नसतं ते आपल्याला आवडतं. मला त्यांचे सरळ केस आवडायचे आणि त्यांना माझे कुरळे केस आवडायचे.  जपानी लोकांना टक्कल पडत नाही असे नाही पण त्याचे प्रमाण आपल्यापेक्षा बरेच कमी आहे. निसर्गतः त्यांच्या केसाचा रंग हा काळा असतो पण 80% लोक केसांना त्यांच्या आवडीचा रंग लावतात. अगदी सत्तर ऐशी वर्षाची माणसं सुद्धा याला अपवाद नसतात. इथे न्हाव्याला खूप मान देतात. त्यांना इथे आर्टीस्ट असं संबोधलं जातं. ते सुद्धा खुप मेहनत घेऊन तुमचे केस कापतात. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या न्हाव्याकडे माझी  "फाईल" असायची. त्यात माझ्या केसांना कोणता रंग कधी लावला ह्याची पूर्ण माहिती असायची. केस कापायला ४००० येन (रु २४००)आणि रंगवायला ६००० (रु ३६००) येन लागायचे. सुंदर दिसणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असच ही लोक मानतात.
जपानी लोक हे खरं तर मंगोल वंशातले. जपानी मूल जेव्हा जन्माला येत, तेव्हा त्याच्या पार्श्वभागावर निळसर रंगाचे डाग असतात. वयाच्या साधारणतः चौथ्या वर्षी ते आपोआप निघून जातात. आपण मराठीत कसं बोलतो, अरे अजून "तो अंड्यात आहे". तस जपानी लोक बोलतात, " ओशिरी गा मादा आओई " म्हणजे त्याचा पार्श्वभाग अजून निळा आहे. आपण ह्यांच्या शाळेत डोकावलं की असं दिसतं की ही मुलं आपल्याला मुलांपेक्षा थोडी कमी मस्ती करतात. प्रत्येक मूल हे स्वतःच दप्तर स्वतः उचलून शाळेत जातं. मुलांना उचलून सुद्धा घेत नाहीत. आई तिच्या मुलाबरोबर हळूहळू चालते. आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे इथली सगळी मुलं अॉफीसच्या वेळेत जन्माला येतात. गरोदरपणात जपानी आई तिचं वजन सहा किलोनी वाढवते. डॉक्टर बोलवतील त्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि मुलाला जन्म देते. सोनोग्राफी अगोदरच केल्यामुळे मुलगा का मुलगी हे अगोदरच माहित असते. नाव सुद्धा आधीच ठरलेलं असते. वर सरकार कडून 4,20,000 येन (रु अडीच लाखा )सुद्धा आईला लगेच दिले जातात. बाळा साठी वाढवलेले सहा किलो एक वर्षाच्या आत परत कमी केले जातात त्यामुळे ह्या आया संतूरनी आंघोळ करतात का हा प्रश्न पडतो. गरोदरपणाच्या काळात आणि बाळ अंगावर पीत असे पर्यत जपानी आई  बिअर, व्हिस्की, सिगारेट तर सोडाच कॉफी सुद्धा पीत नाही. गरोदरपणात पोटाचा भाग हा गरम ठेवला जातो. बर्याच रेस्टॉरंट मधे त्यांना ब्लँकेट दिली जातात. बस आणि ट्रेन मधे त्यांना बसायला जागा दिली जाते.  २0१७ च्या जनगणने नुसार एक बाई सरासरीने १.५ मुलांना जन्म देते. कमी होत चाललेली जनसंख्या आणि वृद्धांच्या संखेत होणारी वाढ ही जपान समोरची एक मोठी समस्या आहे.
शाळेत पहिली दोन वर्ष काहीही अभ्यास शिकवत नाहीत. या खेळा आणि जा.  या काळात वेळेवर शाळेत जाणे, व्यवस्थित वेशभूषा करणे, कचरा न करणे, खेळून झाल्यावर खेळणी जागेवर ठेवणे, इतर मुलांबरोबर नीट वागणे, सांघिक वृत्ती इत्यादी गोष्टी नुसत्या न शिकवता त्या रक्तात भिनवल्या जातात. एखादा मुलगा माझ्या मुलाला "गायकोकूजीन" म्हणजे "परदेशी" अस म्हणाला तर लगेच त्याची आई त्याला दामटायची. आपण किती सहज उत्तर भारतीयांना "भैया" आणि दक्षिण भारतीयांना "मद्रासी" बोलतो. त्यांना वाईट वाटत असेल हा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही.  कॉलेज मधे माझ्या वर्गात केनीथ चॕग नावाचा मुंबईत जन्मलेला चाईनीज वंशाचा एक मुलगा होता. आम्ही त्याला "चिंगी" म्हणूनच हाक मारायचो. मला माझीच लाज वाटली.
आपण आता सांघिक वृत्ती बद्दल बोलू. आता माझं हे वाक्य जरा नीट वाचा. "एक भारतीय माणूस हा दहा जपानी माणसांसारखा असतो पण दहा भारतीय माणसे ही एक जपानी माणसा सारखी असतात."  समजलं का? आपला एक माणूस हा वाघासारख काम करू शकतो पण दहा जण एकत्र आली की संपलं. कोणीही काम करीत नाही. ह्याचं कारण टीम वर्कचा अभाव. मरू दे ना मला काय करायचं आहे? बघेल कोणीतरी. इथे अगदी लहान पणा पासून टीम वर्क शिकवलं जातं. वर्गातील मुलांचे छोटे छोटे गट तयार करून मग सामने खेळवले जातात. बक्षीस हे गटाला दिले जाते. वैयक्तिक स्पर्धा नसल्यामुळे मुलांची मैत्री जास्त दृढ होते. मी असे ऐकून आहे की इथली खूप हुशार मुले काही प्रश्नांची उत्तरे मुद्दाम चुकीची लिहीतात कारण त्यांना त्यांच्या ग्रुप बरोबर राहायचे असते. या उलट आपल्यालाकडे माझाच बाब्या त्याच्या मित्रांपेंक्षा कसा जास्त हुशार आहे हे दाखवण्यात पालकांमधेच चुरस असते. ह्या टीम वर्कचा देशाला किती फायदा होतो ह्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत. कुठल्याही फॕक्टरीत अनेक विभाग असतात. ह्या विविध विभागांमधल टीम वर्क अत्यंत सुरेख असते. परिणामी त्यांच्या मालाची प्रत जागतिक बाजारपेठेत उंचावते. अॉफीस मधे सुद्धा एक माणूस कधीच निर्णय घेत नाही. तो सर्वानी मिळून घेतला जातो. अजूनही कितीतरी कार्यालयात दिवसाची सुरवात ही कवायत करून होते. एखाद्या मोठ्या खोलीत किंवा पटांगणामध्ये सगळे जण जमतात. पाच मिनीटाची कवायत करून अंगात उत्साह संचारल्यावर ही लोक एखादं गीत किंवा प्रार्थना एकत्र म्हणतात. ह्या मधे "आम्ही आपल्या ग्राहकांना उत्तम मार्गदर्शन करू. आमचे ग्राहक हे सदैव आमच्याबरोबर राहतील . आमच्या मालाचा दर्जा हा जगात सर्वोत्तम असेल ..." अशी काही काही त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भातील वाक्य असतात. या सर्वाचा शेवट "बांझाय" या घोषवाक्याने होतो. "बांझाय" चा समानअर्थी शब्द आहे "हर हर महादेव". हा सगळा प्रकार जवळजवळ १५ मिनीट चालतो पण ह्यातून जी सकारात्मक उर्जा निर्मिती होते त्याचा तुम्ही विचारपण करू शकणार नाहीत. लोक बरं नसेल तरीसुद्धा  कामावर येतात कारण मी जर का गेलो नाही तर माझ्या सहकाऱ्यांना माझे काम करावे लागेल आणि मग त्यांना त्रास होईल ही भावना त्या मागे असते. तुम्हाला इथे कार्यालयात गणवेश घालावा लागतो. त्यातून सुद्धा एकीची भावना मनात रुजवली जाते. आणि मग कळत नकळत तुम्ही तुमचा पूर्ण जीव कामात ओतता. आता कल्पना करा जर ५० करोड जपानी माणसं जीव तोडून काम करत असतील तर त्यांची उत्पादन क्षमता किती पटीने वाढत असेल. शाळेत लावलेले टीम वर्कचं छोट्याशा रोपाचा पुढे वृक्ष होतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ होतो.
शाळेत आणखी एक गोष्ट रक्तात भिनवली जाते ती म्हणजे वेळेचे महत्त्व. ह्याचा त्या देशाला कल्पने पलीकडे फायदा होतो. मी जपानमध्ये नवीन होतो तेव्हाची एक गोष्ट सांगतो. मी एका जपानी मित्राला भेटणार होतो. किती वाजता भेटायचं ? तर मी म्हटले येतो तीन , साडेतीन वाजता. तो पूर्णपणे गोंधळून गेला. मला विचारलं की तीन-साडेतीन म्हणजे नक्की किती ? तीन वाजता की साडेतीन वाजता ? आपण जसं हा अर्धा तास फुकट जाणार हे गृहीत धरतो ते तिथे होत नाही. जर कार्यालयाची वेळ सकाळी ९ ची असेल तर बरोब्बर ९ वाजता संपूर्ण कार्यालय ग्राहकांसाठी सज्ज असते. एखाद्याचा संगणक चालू होतोय वा तो चहा पितो आहे वा फोन वर बोलतो आहे अस कधीच होत नाही.  ही गोष्ट डॉक्टरांना सुद्धा लागू असते. सकाळी साडेआठ वाजता डॉक्टर त्याच्या खुर्चीवर असलाच पाहीजे. मला भेटायला कधीकधी बाहेरच्या कंपनीची माणसं यायची. ते ठरलेल्या वेळेच्या दहा पंधरा मिनीट आधी यायची आणि बरोब्बर ठरलेल्या वेळी फोन करून सांगायची की आम्ही आलो आहोत म्हणून. वेळेची किंमत सांगणारं आणखी एक उदाहरण म्हणजे यांच्या ट्रेनस्. त्या एक मिनीटपण उशीरा नसतात. आपल्यालाकडे हळू गाडीचे दोन रुळ आणि जलद गाडीचे दोन रुळ असतात. जपान मधे फक्त दोन रुळावर हळू, जलद आणि अतिजलद गाड्या अगदी बिनधोकपणे धावतात. अगदी बुलेट गाडीसुद्धा याला अपवाद नाही. काही ठराविक थांब्यांवरच चार रुळ असतात. हळू गाडी शेजारच्या रुळावर घेतली जाते आणि मधल्या रुळावरून जलद गाडी पुढे मिघून जाते. जवळजवळ ४०% बांधकाम खर्चात बचत होते. देशाचे अक्षरशः अब्जावधी रुपये वाचतात का तर वेळेचं महत्त्व जाणल्यामुळे.
मी तर म्हणेन तुम्ही एकदा तरी नक्की जपानला जा. नुसतं बघायला नका जाऊ तर जगायला जा.

धन्यवाद
राजेश वैद्य.
9969682961
 
 

Japanese Expressions :

जपानी संस्कृती मधे काही अभिव्यक्तींना (expressions) अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसाची सुरूवातीला "ओहाययो गोझाईमास" म्हणजे "शुभ सकाळ" ने होते. घरातला प्रत्येक माणूस दुसऱ्याला रोज "शुभ सकाळ" बोलतो. घराबाहेर पडल्यावर तुमच्या इमारती मधला किंवा परिसरात रहाणारा कोणीही समोर आला की त्याला सुद्धा  "ओहाययो गोझाईमास" बोलायचं असतं. कार्यालयात शिरल्यापासून तुमच्या जागेवर जाई पर्यंत जो कोणी भेटेल त्या सर्वांना तुम्हाला  "ओहाययो गोझाईमास"बोलावं लागत. असे केल्यामुळे आपण अनाहूतपणे वीस पैचवीस वेळा बोलतो, हसतो आणि एक सकारात्मक उर्जा घेऊनच कार्यालयीन कामाला सुरूवात करतो.
आपण घराबाहेर पडताना जस "येतो मी" असे बोलतो तसे जपानमधे घरातून बाहेर पडणारा माणूस बोलतो "इत्तेकिमास" म्हणजे "मी जाऊन आलो".  मग घरी असणारी सगळी माणसं  जाणाऱ्याला बोलतात "ईत्तेराशाय" म्हणजे "लवकर घरी परत या".
इथे कोणत्याही कामाला कमी लेखलं जात नाही. सर्वांना आदराने वागतात. मग तो जमीन साफ करणारा असू दे वा IBM चा इंजिनियर असू दे. गंमत म्हणजे कार्यालय साफ करणारी बाई खाली "स्टार बक्स" मधे तुमच्या बाजूच्या टेबलवर बसून कॉफी पिता पिता तुमच्या बरोबर संवाद पण करते. आपल्यालाकडे हे केवळ अशक्य आहे. आपल्या आणि त्यांच्या (सफाई कामगारांच्या ) पगारात खूपच तफावत आसते.
संध्याकाळी कार्यालयातून घरी जायची पण एक पद्धत आहे. समजा तुम्ही काम करीत आहात आणि तुमचा सहकारी घरी जायला निघाला आहे. अशावेळी तुम्ही बोलायच "ओत्कारेसामा" म्हणजे "तुम्ही जे काम केलतं त्याबद्दल तुमचे आभार". समोरचा माणूस बोलतो "ओसाकिनी" ह्याचा अर्थ "मी तुमच्या आधी जात असल्यामुळं मला माफ करा". तुम्हाला नवल वाटेल पण हे रोज केल जात. आणि मी खरं सांगतो  "ओसाकिनी" बोलताना आपल्याला लाजल्या सारख होत. ही लोक जरा ज्यास्तच काम करतात. आमच्या टिम मधला एक जपानी माणूस सकाळी ८ ते रात्री ८ काम करायचा. आणि घरी जाऊन परत काम करायचं. घरी जाता जाता तो ट्रेन मध्ये एक बिअला पियायचा. बस्स तेच काय ते त्याचे मनोरंजन. आणखी एक कामसू माणूस मी पाहीला. त्याच्या कार्यालयाची वेळ ८ःं३० ची पण हा पठ्या ७ ला यायचा. कारण काय तर ट्रेन मध्ये बसायला जागा मिळते. मला हसाव की रडाव तेच कळेना. अशावेळी मी गप्प बसतो. मौनम् सर्वाथ साधनम्
दुपारी १२ पासून संध्याकाळी ६ पर्यत चा वेळ आसतो "कोनिचीवा" चा. म्हणजे "शुभ दुपार". या काळात तुम्ही ज्या लोकांना पहिल्यांदा भेटाल त्यांना "कोनिचीवा" बोलायचं. अदगी फोन वर किंवा ईमेल वर सुद्धा. इथे साधारणतः 12 ते 1 हा लंच टाईम असतो. अचानक पणे उपहारग्रुहात लोकांचा पूर येतो. आत बसायला जागा मिळत नाही.
 मग काही काही लोक "बेन्तो" म्हणजे "जेवणाचा डबा" विकत घेतात आणि स्वतःच्या डेस्कवर जाऊन जेवताना दिसतात. तुम्ही  कुठेही जेवा पण जेवायच्या आधी तुम्हाला तुमच्या जेवणाला नमस्कार करायचा असतो आणि बोलायचं असत "इतादाकीमास".  आपण कसं बोलतो "वदनी कवळ घेता ...".  आपण पूर्ण स्तोत्र बोलतो. हे एकच शब्द बोलतात पण त्याचा अर्थ असतो "हे झाडांनो वा प्राण्यांनो, आमच्या साठी तुम्ही बळी पडलात. आम्हाला माफ करा". 
 जर का बाहेरच वातावरण छान आसेल तर काही लोक बागेत जाऊन पण जेवतात. अर्थात कुठेही कचरा न करता. इथे सर्व बागांमधे पिण्याच्या पाण्याची सोय दोन नळांमार्फत केलेली असते. एक नळ हा आपल्या सारखाच असतो. ह्यानळा तून तुम्ही बाटली किंवा पेला भरू शकता कारण पाण्याची धार नळ उघडल्यावर खाली जाते. दुसरा नळ हा बरोब्बर उलटा लावलेला असतो. हा नळ सोडला की पाण्याची धार कारंज्यासारखी वरती उडते. पाणी पिण्यासाठी हा नळ अतिउत्तम. वर उडत असलेले पाणी अगदी सहज पणे पिता येते.
इथे काही जण डबा खाऊन झाल्यावर स्वतःच्या डेस्कवर जाऊन चक्क १५ ते २० मिनीट झोपतात. जपानी वामकुक्षी. काही जण कार्यालयात जाता जाता एखादी कॉफी विकत घेतात आणि डेस्क वर जाऊन पितात.  एक गोष्ट नक्की की काहीही झाल तरी ही लोक त्यांची जेवायची वेळ संपण्यापूर्वी त्यांच्या डेस्क वर हजर असतात. 
कार्यालयात जायची वेळ ठरलेली असली तरी निघायची वेळ ही अनिश्चितच असते. बहुतेक जपानी माणसं एखाद दोन तास ज्यास्त काम करतातच करतात. याला अपवाद असतात  कॉन्ट्रेक्ट एमप्लॉइज (करारबद्ध कर्मचारी ). ह्यांना तासावर पगार मिळतो.
इथे घरात प्रवेश करायची पण एक खास पद्धत आहे. घरात प्रवेश करणारा माणूस चप्पल काढताना एक जोरदार आरोळी ठोकतो. "तादाईमा" म्हणजे "मी आलो". मग घरातील सगळी जण बोलतात "ओकाएरी" म्हणजे "तुमच घरात स्वागत आहे". आहे की नाही गंमत. तुमच्याच घरात रोज तुमच स्वागत केल जात.
घरी आल्यावर जपानी लोक पहिले जेवायला बसतात. घरात "डाइनिंग टेबल" नसते. ही लोक जमिनीवर बसतात आणि ताट एका दिड फूट उंचीच्या टेबलवर ठेवतात. घरातली सगळी लोक गोल करून टेबला भोवती बसतात. आपण जेवताना मांडी घालून बसतो (बसायचो) पण ही लोक पाय मागे दुमडतात आणि स्वतःच्या पायावर बसतात. मला हे कधीच जमल नाही. मी ज्यास्तीत ज्यास्त ५ मिनीट बसू शकतो पण ही लोक तासंतास अशी बसू शकतात.
जेवायची सुरूवात "इतादाकीमास" आणि शेवट "गोचिसोसामा" नी होतो.  "गोचिसोसामा" हे जी व्यक्ती जेवण बनवते तिला बोललं जात. ह्याचा अर्थ "हे चांगले जेवण बनवल्या बद्धल धन्यवाद".
बहुतेक लोक झोपायच्या आधी अंघोळ करतात. ह्यांच्या नहाणीग्रृहात दोन विभाग असतात. एक हॕड शॉवर आणि दुसरा बाथटब. हॕड शॉवर वापरून आपण स्वच्छ अंघोळ करायची असते आणि त्या नंतर बाथटबमधे बसायचं असते. बाथटब मधल पाणी फेकून द्यायचे नसते. घरातील सर्व लोक ते एकच पाणी वापरतात. सर्वांची अंघोळ झाली की ते पाणी धुलाईच्या यंत्रात चढवलं जाते. त्यासाठी एक छोटे यंत्र मिळते, ते बहुतेक सर्व घरात असते. यामुळे दोन फायदे होतात. एक तर पाण्याची बचत होते आणि दुसरे म्हणजे जर रात्री भुकंप झाला तर तुमच्या घरात काहीतरी पाणी राहतं. पाणी हे २४ तास येत असल्यामुळे इथल्या घरात हंड्या, कळश्या, बादल्या कधीच नसतात. पाणीपुरवठा मुबलक असला तरी त्यावर सरकारी नियंत्रण असते. प्रत्येक घराला (सोसायटीतल्या सुद्धा) पाण्याचे स्वतंत्र मीटर असते. समजा एखाद्या घरात ४ माणसं रहात असतील तर त्यांना अंदाजे किती पाणी लागणार हे त्यांना माहीत असत. जर का तुम्ही ज्यास्त पाणी वापरलत तर त्यांचा माणूस घरी येऊन चौकशी करतो. माझ्या घरी कधी माझे नातेवाईक महिनाभर राहिले तर ती लोक चौकशी करायला यायची.
दिवसाचा शेवट हा "ओयासूमी" म्हणजे "शुभ रात्री" ने केला जातो. इथल्या बायका रात्री झोपताना मेकप पूर्ण पणे काढून टाकतात आणि माझ्या मते म्हणूनच त्या दिर्घायुषी होतात. म्हणजे असं की रात्री येव्हा यम येत असेल तर तो बिचारा चक्राउन जात असणार ... अरे ही तर कोणतरी वेगळीच दिसतेय आणि तो पुढे जात असणार.

आता "सायोनारा" ....

आता "सायोनारा" म्हणजे काय विचारू नका.  प्रत्येक भारतीयांना हा शब्द १००% माहित असतो.

जपानची संस्कृती समजून घेण्यासाठी या अभिव्यक्ती समजणे आवश्यक आहे.

राजेश वैद्य
९९६९६८२९६१
©

Earthquakes :

जपान हे नुसतं नाव जरी घेतलं तरी डोक्यात भुकंपाच्या घंटा वाजतात. भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं की तिथे पुठ्याची घर असतात म्हणे. ती पावसाळ्यात नरम पडत असतील का किंवा जोराच्या वार्याने उडून गेली तर असे अनेक प्रश्न मनात यायचे आणि मनातच विरून जायचे... विचारणार कोणाला ? बाईना विचारलं आणि त्या रागवल्या तर...  नसती पंचाईत व्हायची. एकदा भूगोलाच्या बाईनां गमतीत मी न्युयॉर्कला जाऊन आलो आहे असं सांगितलं होतं तेव्हा बिनपाण्याने चंपी झालेली.

पुढे अस कळलं की आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग हा अखंड नसून १२ ते १५ तुकड्यांचा किंवा प्लेटचा बनलेला आहे. या टेक्टॉनिक प्लेटस अविरत हलत असतात आणि दुर्दैवाने यातल्या ४ प्लेटस बिचाऱ्या जपानच्या खाली आल्या आहेत. पूर्वेला पॕसेफीक आणि फिलीपाईन प्लेटस आहेत तर पश्चिमेया युरासियन आणि नॉर्थ अमेरीकन प्लेटस आहेत. इथे वर्षाला साधारणतः १५०० भुकंप होत असतात.
आता आपण पाहणार आहोत की जपानी लोकं या नैसर्गिक आपत्तीला कस काय तोंड देत असतील. चला तर मग आपण त्यांच्या घरापासूनच सुरूवात करूया.

इथे सर्व प्रथम आपल्याला त्यांच्या पॕगोडाच्या वास्तुशिल्पाकडे पहावे लागेल. लहान असताना मी जेव्हा वाचायचो की जपानमध्ये पाच मजली पॕगोडे आहेत तेव्हा ह्यांचे एवढे कौतुक कशाला करतात हेच कळत नसे. आपल्या देशातसुद्धा अशा मोठमोठ्या वास्तू आहेतच की.  नंतर असे कळले की ते भुकंपाला तोंड देऊन अजूनही  उभे आहेत यातच त्यांचे वेगळेपण आहे.

हे पॕगोडे दोन प्रकारे बांधलेले असतात. एका पध्दती नुसार पॕगोड्याचा खालचा भाग, आपण त्याला बेस म्हणू हा पायासोबत एकसंध असतो तर वरचा भाग हा हलणारा असतो. म्हणजे समजा एक पाच मजल्याची इमारत आहे. तर त्या इमारतीचा पाया, तळमजला आणि पहिला मजला हा  एक भाग असतो जो स्थिर असतो... त्याच्या वरचे जे मजले आहेत (दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा)हा दुसरा  भाग असतो जो एकत्रितपणे हलतो. 
दुसऱ्या पद्धती मधे..खालचा भाग (बेस ) हा तसाच असतो पण हलणारा भाग हा वेगळ्या पद्धतीने बांधला जातो. म्हणजे जेव्हा दुसरा आणि चौथा मजला हा उजवीकडे सरकतो त्याचवेळी तिसरा आणि पाचवा मजला हा डावीकडे सरकतो. त्यामुळे इमारतीचा भार हा बॕलन्स केला जातो. जपानमध्ये बहुतांशी इमारती ह्या वास्तूशास्राच्या पहिल्या संक्लपनेनुसार बांधलेल्या दिसतात. 

जपानमध्ये सर्व इमारती या सिमेंट कॉक्रिट ने बांधलेल्या असतात. त्यांना दोन जीने असतात. ते एकमेकांपासून दूर आणि इमारतीच्या बाहेर काढलेले असतात. जिने बनवताना एक खास अग्नीविरोधक बांधकाम साहित्य वापरलेले असते.  प्रत्येक घराला एक बाल्कनी असते. त्या बाल्कनीच्या फ्लोअरींग वर एक स्टीलचे चौकोनी झाकण असते. ते उघडल्यावर आत एक छोटी शिडी असते. त्या आधारे तुम्ही सहजपणे खालच्या मजल्याच्या बाल्कनीत येऊ शकतात. या प्रकारे तुम्ही कुठल्याही मजल्यावरून थेट तळमजल्यापर्यत येऊ शकतात. ह्याचा अर्थ संकट काळात घर सोडण्याचे तीन पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतात.

शहरातील उंच इमारती वगळता बहुतांशी जपानी लोग हे लाकडाच्या घरात रहातात. ही घरे साधारणपणे एक मजली असतात. खाली स्वयंपाकघर, दिवाणखाना, शौचालय, नहाणीघर आणि एखादी खोली असते. वरच्या मजल्यावर शयनखोल्या असतात व दक्षिणेकडे एक बाल्कनी असते.  घराचा पाया हा अनेक लाकडी खांबानी बनवलेला असतो. त्यामुळे जरी जमिनीला भेग पडली तरी घर पडत नाही. घरातल्या भिंती ह्या लाकडी फळ्यांनी बनवलेल्या असतात. घराचे प्रवेशद्वार हे लाकडी असते पण दोन खोल्यांना जोडणारे दरवाजे हे जाड पुठ्यानी किंवा पातळ लाकडी पट्यांनी बनवलेले असतात. घराला ततामी फ्लोअरींग असते. "ततामी" म्हणजे जाडी चटई. जपानमध्ये पूर्वी ततामी फ्लोअरींगच असायचे पण हल्लीच्या शहरातील घरात फक्त एका बेडरूममध्ये ततामी असते. 
ततामी म्हणजे १७६ सेंमी लांब , ८८ सेंमी रुंद आणि ५.5 सेंमी जाड  भाताच्या काटक्यांपासून बनवलेली चटई. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे ही उन्हाळ्यात गरम आणि थंडीत गार होत नाही. जपानी लोक अशा ततामी रुम मधे गादी घालून झोपतात. बहुतेक गाद्यांची लांबी १९५ सेंमी आणि रुंदी ९५ सेंमी  असते. सकाळी ह्या गाद्या उचलून त्याच खोलीला लागून असलेल्या क्लोझेट मधे ठेवल्या जातात. 
असे केल्याने पलंग विकत घ्यायची गरज नसते.  मला वाटतं आपण लोक पलंग घेऊन पैसे फुकट घालवतो. समजा तुम्ही दादरला एक किंग साईज बेड घेतला. बेडचे क्षेत्रफळ झाले ६ x ६ = 36 स्के.फि. दादरचा रेट आपण ४५,००० मानला तर तुमच्या लक्षात येईल की आपण १६ लाखाच्या जागेवर फक्त रात्री झोपतो. 

बेडरूममध्ये कुठलही जड सामान (कपाट) ठेवले जात नाही.  घराचे छत हे कौलारू असते.  तुमच्या एक लक्षात आले असेल की ह्या घरात दगड वीटा किंवा लाद्या अजिबात वापरल्या जात नाहीत त्यामुळे जर भुकंप झाला तरी जिवीतहानी टळते. त्याच बरोबर प्रत्येक घरात एक आपादकालीन पिशवी तयार असते. त्यामधे  प्रथमोपचाराचे साहित्य , बॕटरी, पाणी आणि दिर्घाकाळ टिकणारे खाद्यपदार्थ असतात. 
कार्यालयात किंवा दुकानात जिथे उंच कपाटांची आनिवार्य गरज असते, ती कपाटं रेलनी भिंतीला जोडलेली असतात. त्यामुळे ती उजवी किंवा डावीकडे सरकू शकतात पण तुमच्या अंगावर पडू शकत नाहीत. घरामधली उंच कपाटं साखळीनी मागच्या भिंतीला बांधलेली असतात.  भुकंपाचे कमीतकमी हादरे संगकांना बसावेत म्हणून डेटा सेन्टरमधले संगणकाचे रॕक्स हे खाली आणि वर स्पिंगनी जोडलेले असतात. तुमच्या डोक्यावर ज्या ज्या गोष्टी असतात .. उदाहरणार्थ ट्यूब लाईट, जाळ्या, फॉल्स सिलींग,  आगीच्या संरक्षणासाठी लावलेले पाण्याचे पाईप किंवा काहीही हे दोन किंवा तीन सपोर्ट वर असतात. त्यामुळे जरी भुकंपाच्या काळात एक सपोर्ट तुटला तरी ती वस्तू खाली पडत नाही.

इथे सिलींगफॕन हा प्रकार नसतो. कदाचित भुकंपाच्या सततच्या भितीने ते मुद्दामच वापरत नसावेत. 
इथे एक ठराविक तिव्रतेचा भुकंप झाला की घरातल्या विजेचा मुख्य स्विच आपोआप बंद होतो. मोठा झाला तरच. छोटे छोटे तर होतच असतात. २००१ साली आम्ही नवीन असताना एकदा असेच काळोखात बसलेलो. पहिल्यांदा वाटलं की लाईट गेले आहेत. नंतर लक्षात आलं की आपलेच गेले आहेत. मग शेवटी थोड लाजत लाजतच शेजारच्यांचा दरवाजा ठोकला. भाषेची पूर्ण बोंबाबोंब होती. हातवारे करून कसतरी त्यांना कळलं एकदाच. तरी एक बरं  झालेलं की ह्या आधी मी त्यांना साबणाचा डबा दिलेला. ही एकजपानी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन घरात रहायला जाता, तेव्हा एक कुठलीही गृहोपयोगी वस्तू तुमच्या शेजारच्यांचा द्यायची असते. धुलाई यंत्र सर्वच घरात असते म्हणून बरेच जण धुलाईचा साबण देतात. हे देताना एक ठराविक वाक्य बोलायचे असते. त्याचे मराठी भाषांतर असे. "माझं नाव राजेश वैद्य आहे. मी ३०४ मधे रहायला आलो आहे. मला प्रेमाने वागवा". किती छान पद्धत आहे नाही?  हो. आणखी एक.  ते तुम्हाला घरात बोलवणार नाहीत. दरवाज्यातूनच बोलतील. वाईट वाटून घेऊ नका. 
मी एकदा एका जपानी मित्राबरोबर त्याच्या कोणा मित्राच्या घरी गेलेलो. काहीतरी द्यायचं होत. तो बाब्या घराच्या उंबर्ठ्यावर दहा मिनीटं  बोलत उभा होता पण त्यानी आम्हाला घरात नाही बोलवलं. मला खुप राग आलेला पण माझ्या मित्राला यात काहीही वावगे वाटले नाही. मग मी मलाच समजावे की बाबा जर का तुला इथे राहायचे असेल तर जपानी संस्कृतीच्या अनुषंगाने राहावे लागेल. उगाच घरात बोलवले नाही, चहा विचारला नाही सारख्या फालतू गोष्टींचा मनस्ताप नाही करून घ्यायचा. त्याच वेळी मनात आपल्या "अतिथी देवो भवं" संस्कृतीचा रास्त अभिमान वाटला. भुकंपावर बोलता बोलता कुठेतरी भलतीकडेच वाहात गेलो.
एक महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला भुकंप होतं असतो  त्या वेळी शांत बसून तो सूक्ष्म पणे अनुभवाचा असतो आणि आपण पुढेमागे हलतोय का वरखाली हलतोय ते पहायचं. पुढेमागे हलत असाल तर समजायच की भुकंपाचा मुख्य बिंदू ज्याला एपिसेंटर बोलतात तो बराच लांब आहे. पण जर का वरखाली हलत असाल तर लगेच देवाची प्रार्थना करायची की बाबा थांबव म्हणून ... जपान मधल्या बहुतेक सर्व इमारती ह्या ७ रिष्टरचा  धक्का सहन करू शकतात पण भुकंपाच एपिसेंटर जर तुमच्याच खाली असेल तर कोणीच काही करू शकत नाही.

भुकंप थांबला की आम्ही TV लावायचो. कुठल्याही जपानी चॕनेल वर भुकंपाची पूर्ण माहिती खालच्या पट्टीवर लग्गेच येते. त्सुनामीची शक्यता असेल तर मनोरंजकनाचे सर्व कार्यक्रम थांबवून लोकांना सावध केल जात. किनाऱ्यावर लाऊड स्पिकर वरून ताबडतोब सूचना दिल्या जातात. हे सर्व आपण TV वर पाहू शकतो.  पूर्ण किनारपट्टी "हाय अलर्ट" वर जाते.    
भुकंप हा एका विशिष्ट लेव्हल पेक्षा  जास्त असल्यास लोकल ट्रेनला आणि बुलेट ट्रेनला आपोआप ब्रेक लागून त्या थांबवल्या जातात.  एखादा मोठा भुकंप झालाच तर काय करायचे ते सरकारला सोडाच पण  लोकांना सुद्धा माहित असते.

भुकंप झाल्यावर किंवा आग लागल्यावर काय करायचे असते हे मुलांना शाळेत असल्यापासून शिकवलेले असते. अग्नीशामक दलाकडे कित्येक  मोबाईल व्हॕन्स असतात. ह्या दर वर्षी सर्व शाळांमध्ये तसेच प्रत्येक महानगर पालिकेच्या वार्ड मधे आणल्या जातात. ह्या दिसायला जपानी घरासारख्या असतात पण खाली चाकं असतात. एकावेळी ६ ते ८ लोकांना वर बोलावलं जात आणि टेवल खुर्ची वर बसविले जाते. मध्यभागी एक डिजिटल इंडिकेटर असतो. थोड्याच वेळात ते अख्ख घर भुकंप झाल्यासारखे हलायला लागते. डिजिटल इंडिकेटरवर भुकंप किती रिष्टरचा होतो आहे हे दाखवले जाते. भुकंप झाल्यावर  प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या लोकांना आपादकालीन पिशवीत असलेले  हेल्मेट  डोक्यावर घालून टेबलच्या खाली बसायचे असते. खाली उभे राहून बघायला हे सगळं सोपं वाटतं असलं तरी वरं जाऊन करताना तारांबळ उडते पण तरीदेखील आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास नक्कीच येतो. 

भुकंप होत असताना किंवा आग लागली असेल तर लिफ्टचा वापर करायचा नसतो हे आपल्यालाही ठाऊक आहे पण जिना कसा उतरावा हे जपानी लोकांकडून शिकण्यासारखे आहे. जिना उतरताना दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. १) समोरच्या माणसाला न धकलणे. यामुळे आपोआपच धकला-धकली होत नाही. कोणी खाली पडत नाही आणि चेंगराचेंगरी होण्याचा धोका टळतो. २) तोंड बंद ठेवणे. यामुळे जिन्यात गोंगाट होत नाही आणि लाऊड स्पिकर वरून ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात त्या सर्वांना ऐकू येतात.

आता तुम्हाला समजले असेल की हे भुकंप झालाच तर जगातला सर्वात सुरक्षित देश म्हणजे जपान.

राजेश वैद्य
९९६९६८२९६१

 

Back to Japan :

जपान सोडून दोन वर्ष होत आलेली. पण का कोण जाणे सिंगापूर मध्ये माझं मन रमत नव्हते. तस पाहील तर देश चांगला होता. त्यांनी तर मला एक वर्षात त्यांचा PR (permanent resident) सुद्धा दिलेला. मुलगा भारतीय शाळेत जाता होता. ड्रेझनर बॕन्केत चांगली नोकरी होती.  मेल्विल पार्क नावाच्या सोसायटी मधला फ्लॅट तर सुंदरच होता. पण कुठे तरी काहीतरी कमी पडत होत.  त्या आधीची अडीच वर्ष (मे ९७ ते जानेवारी 2000)मी जपानला काढली होती आणि ती मला परत जपानला जायला सांगत होती.
एक दिवस  पासपोर्ट वर जपानचा वर्कीग विसा लागला आणि मी निश्चिंत झालो. मला टोकियोच्या ING बेअरींग्स मधे नोकरी मिळाली होती. बेअरींग्स म्हटलं की डोळ्यासमोर येतो "निक लिसन". या पठ्याने 1.4 बिलियन डॉलर्स चा तोटा करून ती १०० वर्ष जूनी ब्रिटीश बॕन्क मोडीत काढली होती.  झालं असं की ह्याने जपानच्या शेअर बाजारावर मोठा जुगार लावला होता. १७ जानेवारी १९९५ ला सकाळी ५:४६ ला कोबेला ६.९ रिष्टरचा भुकंप झाला आणि जपानचा शेअर बाजार कोसळला आणि बॕन्क सुद्धा . पुढे बेअरींग्स ला ING ने विकत घेतली आणि बेअरींग्स बॕन्क चे नामकरण ING बेअरींग्स असे झाले. सिंगापूर मधल्या माझ्या घरातल्या बहुतेक गोष्टी मी फुकट वाटल्या आणि फक्त दोन बॕगा घेऊन नोव्हेंबर  २००१साली जपानला परत थडकलो.
माझी रहायची व्यवस्था एक महिन्यासाठी न्यूओतानी या पंचतारांकीत हॉटेलमध्ये केलेली होती. इथे आल्यावर माझ्या डोळ्यासमोर दोन अत्यंत महत्त्वाची कामे होती. एक म्हणजे मुलासाठी शाळा बघणे आणि दुसरे शाळेच्या जवळ अस घर बघणे की जिथून मुलाला चालत शाळेत जाता येईल आणि मला सुद्धा चालत स्टेशनवर जाता येईल. जपानमध्ये आंतरराष्ट्रीय शाळांचे शालेय वर्ष हे सप्टेंबरला सुरू होते आणि त्याची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी ला सुरू होते. आता तर शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले होते. सर्व शाळांनी मला गेटवरूनच घरी पाठवले. फक्त एका शाळेने मला "बघतो" असे म्हटले. शाळेचे नाव होते आओबा जपान आणि फी होती २० हजार अमेरिकन डॉलर्स (रु. १२ लाख). बहुतेक आंतरराष्ट्रीय शाळांमधे जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर एक तरी पालक हा परदेशी नागरिक असावा लागतो पण आओबा जपान मधे ती पद्धत नव्हती त्यामुळे अतिश्रीमंत जपानी मुले या शाळेत यायची. मला हे तेव्हा माहीत नव्हते. त्यांनी माझा अर्ज ठेऊन घेतलेला हेच माझ्यावर त्यांचे उपकार होते. हे सगळे सोपास्कार करण्यात 20 दिवस निघून गेले होते. मला माझं नवीन काम संभाळून ही धावपळ करायला लागत होती.
शाळेतील प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली नसली तरी मी त्या शाळे जवळ घर घ्यायचं ठरवलं. जपानमध्ये जागाविषयक दलाली करणाऱ्या लोकांना "फुदोसान" म्हणतात. स्टेशनपासून जवळच ह्या लोकांची कार्यालये / दुकाने असतात. दुकानाच्या काचेवर जी घर भाड्यानी द्यायची आहेत किंवा विकायची आहेत त्यांचे ले-आऊट चिकटवले ले असतात. त्याच बरोबर खालील माहीती सुद्धा लिहीलेली असते...
१) संपूर्ण पत्ता / छोटा नकाशा
२)घर स्टेशन पासून किती लांब आहे.
3) इमारत किती साली बांधली आहे.
४) इमारत किती मजल्याची आहे.
५) हे घर कितव्या मजल्यावर आहे
६) महिन्याचे भाडे किती आहे.
७) आनामत रक्कम किती आहे.
८) दलालीची रक्कम किती आहे.
९) की मनी किती आहे.
१०) उत्तर दिशा कुठे आहे.
"की मनी" म्हणजे ही रक्कम तुम्ही घर मालकाला बक्षीस म्हणून द्यायची. का तर त्याने त्याचे घर तुम्हाला दिले म्हणून. हा प्रकार फक्त जपानमध्येच दिसतो. अनामत रक्कम हे बहुतेक ठिकाणी २ महिन्याचे भाडे असते आणि एक महिन्याचे भाडे दलाली म्हणून द्यावी लागते.
मी रहण्यासाठी "ताकाईदो" हे स्टेशन निश्चित केल आणि  घर घ्यायला पोहचलो. प्रथम एका "फुदोसान"च्या कार्यालयात गेलो आणि म्हटले "घर आहे का?" त्याने "नाही" असं बोलून मला हाकलून दिले. इथे काही काही "फुदोसान" परदेशी लोकांना उभंच करत नाहीत. ह्याचे कारण त्यांचा एकतर परदेशी लोकांबरोबर चा पुर्वानूभव चांगला नसावा अथवा त्यांना इंग्रजी च दडपण येत असाव. दुसरं एक कारण म्हणजे जपानमध्ये ईराणी लोक बेकायदेशीर गोष्टी करण्यात खुप पुढे असायची. त्याचा फटका सुद्धा आपल्याला बसायचा. ज्याप्रमाणे आपल्याला जपानी, कोरीयन आणि चीनी लोकांमधला फरक कळत नाही त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा ईराणी, हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी लोकांमधला फरक कळत नाही.
मी अजिबात वाईट वाटून न घेता दुसऱ्या
"फुदोसान" कडे गेलो. माझ्यासारख्या गिऱ्हाईकाला नाकारण्यात त्याचाच तोटा होता. आत गेल्यावर मी म्हणालो " मी भारतीय आहे. घराचे कॉन्ट्रेक्ट कंपनी करणार आहे. तुमच्याकडे दोन बेडरूचे घर आहे का?"आणि लगेचच ING बेअरींग्स चे ओळखपत्र पुढे सरकवले. मग काय "लाल गालिचे".. ताबडतोब कॉफी मागवण्यात आली. मी तीन घरं पाहिली आणि एक मला फार आवडले. चार मजली इमारतीत हे घर तिसऱ्या मजल्यावर होते. दरवाजा पूर्व पश्चिम होता. दोन बेडरूमच्या आणि हॉलच्या खिडक्या दक्षिणेस होत्या. नहाणीघर, स्वयंपाकघर आणि एका बेडरूम च्या खिडक्या पूर्वेला होत्या तर हॉलची बाल्कनी पश्चिमला होती. जपानमध्ये दक्षिणेकडे खिडकी असण्याला खुप महत्त्व असते. अशा घरांना "मिनामीमुखी" (दक्षिणेकडे पहणारी ) म्हणतात.
संपूर्ण घराला लाकडी फ्लोअरींग होते पण एका बेडरूममध्ये ततामी फ्लोअरींग होते. "ततामी" म्हणजे जाडी चटई. जपानमध्ये पूर्वी ततामी फ्लोअरींगच असायचे पण हल्लीच्या घरात फक्त एका बेडरूममध्ये ततामी असते.
ततामी म्हणजे १७६ सेंमी लांब , ८८ सेंमी रुंद आणि ५.5 सेंमी जाड  भाताच्या काटक्यांपासून बनवलेली चटई. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे ही उन्हाळ्यात गरम आदृणि थंडीत गार होत नाही. जपानी लोक अशा ततामी रुम मधे गादी घालून झोपतात. असे केल्याने पैशाची आणि जागेची बचत होते.
मला हे घर आवडलेलं पण तो पर्यंत रात्र झाली होती. घरात व्यवस्थित सुर्याचा प्रकाश येतो का आणि हवा येते का हे मला पहायच होतं. शिवाय जवळचं सुपर मार्केट आणि घरापासून शाळेत चालत किती वेळ लागतो ते पण पहायच होत. दुसऱ्या दिवशी मी लंचच्या वेळात परत तिथे गेलो. हवा आणि सुर्यप्रकाश व्यवस्थित येतो आहे याची खात्री केली आणि मग घराच्या करारावर सही केली. घराचे भाडे होते  १,६०,००० येन (रु 1 लाख) आणि कार्पेट एरीया होता ६० मीटर स्क्वेअर. हे माझं जपानमधलं सर्वात छोट घर होत.
पुढे मी 12 वर्षात ४ वेळा घरं बदलली.

- राजेश वैद्य
९९६९६८२९६१

 

 

© 2018 Hikari-Partners. All Rights Reserved. Designed By Rajesh Vaidya.

Please publish modules in offcanvas position.